Mamata Banerjee : सामूहिक अत्याचार प्रकरणावर ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाल्या…

दुर्गापूर : पश्चिम बंगाल पुन्हा एकदा महिलांवरील अत्याचाराच्या घटनेने हादरले आहे. दुर्गापूरमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात दुसऱ्या वर्षीच्या एमबीबीएस विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वादळ सुरू झाले आहे. त्यांच्या ‘मुलींनी रात्री बाहेर जाऊ नये आणि स्वतःचे रक्षण करावे’ या विधानावर भाजप, काँग्रेससह विविध पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून, चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
घटना १० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री उशिरा घडली. दुर्गापूरमधील आयक्यू सिटी मेडिकल कॉलेजच्या दुसऱ्या वर्षीच्या २३ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनी (ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी) तिच्या एका मित्रासोबत जेवणासाठी बाहेर पडली होती. जेवणानंतर परतताना शोभापूर परिसरातील कॉलेजच्या जवळील जंगल असलेल्या भागात तीन-चार पुरुषांनी तिच्यावर हल्ला केला. त्यांनी तिचा फोन हिसकावून घेतला, तिला जबरदस्ती ओढून नेले आणि सामूहिक बलात्कार केला. या वेळी तिचा मित्र तिला सोडून पळून गेला, असा आरोप पीडितेच्या तक्रारीत आहे.
पीडितेला तात्काळ कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ती उपचाराधीन आहे. तिने पोलिसांना दिलेल्या जबानीत या घटनेचे सविस्तर वर्णन केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्ल्यू) चार सदस्यांच्या टीमनेही शनिवारी रुग्णालयात जाऊन पीडितेशी चर्चा केली आणि तिच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. पोलिसांनी घटनास्थळावर फॉरेंसिक तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत.
जबाबदारी कॉलेजवर ढकलली
या घटनेवर रविवारी (१२ ऑक्टोबर २०२५) बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. मुलींनी, विशेषतः हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या बाहेरील राज्यातील विद्यार्थिनींनी, हॉस्टेलचे नियम पाळावे आणि रात्री उशिरा बाहेर जाऊ नये. त्यांनी स्वतःचे रक्षणही करावे. हा जंगलाचा परिसर आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत आणि कोणालाही सोडले जाणार नाही. दोषींना कठोर शिक्षा होईल.” त्या पुढे म्हणाल्या, “मुलगी रात्री १२:३० नंतर कशी बाहेर पडली, हे खासगी वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट करावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संस्थेची आहे. या प्रकरणात सरकारला ओढणे चुकीचे आहे.” ममता बॅनर्जी यांच्या या विधानाने देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिस कारवाई: ३ आरोपी अटक, चौथ्याचा शोध
दुर्गापूर कमिशनरेट पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली आहे. पीडितेच्या जबानीवर आधारित आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व स्थानिक रहिवासी असून, त्यांची नावे अपू बौरी (२१), फिरदौस शेख (२३) आणि शेख रियाझुद्दीन (३१) अशी आहेत. चौथ्या आरोपी शेख सोफिकुलचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार असून, पोलिसांना इतर संशयितांबाबतही माहिती मिळाली आहे. दुर्गापूर ईस्टचे डीसी अभिषेक गुप्ता यांनी सांगितले की, घटनास्थळावर फॉरेंसिक टीम पाठवण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांची चौकशी सुरू आहे.





