Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आधीच अडचणीत सापडलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आधीच अडचणीत सापडलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
पक्षातील पडझड सुरू असतानाच, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या अत्यंत विश्वासू आणि खंद्या समर्थक समजल्या जाणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रिमा भट्टाचार्य यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाचे २० खासदार, ६० आमदार आणि अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी एकामागून एक ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची साथ सोडली असताना, भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यामुळे तृणमूल काँग्रेससमोरील अडचणी कमालीच्या वाढल्या आहेत.
राजीनामा पत्रात भट्टाचार्य यांनी काय म्हटले?
पक्षाला लागलेली गळती आणि कठीण परिस्थितीतही चंद्रिमा भट्टाचार्य या ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुब्रत बक्षी यांच्या जागी नुकतीच, म्हणजेच ३ जून २०२६ रोजी चंद्रिमा भट्टाचार्य यांच्याकडे पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, महिनाभरातच त्यांनी या पदाचा त्याग केला आहे.
आपल्या राजीनामा पत्रात भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले आहे की, त्या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस आणि पक्षाशी संबंधित विविध बँक खात्यांच्या अधिकृत हस्ताक्षरकर्त्या म्हणून असलेली आपली सर्व जबाबदारी मागे घेत आहेत.
यासोबतच, भारतीय निवडणूक आयोगासमोर ममता बॅनर्जी यांच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून यापुढे हजेरी लावणार नसल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. असे असले तरी, त्यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याबद्दलचा वैयक्तिक आदर कायम ठेवला असून, भविष्यातही आपण त्यांचा सन्मान करत राहू, अशी भावनिक जोडही पत्रात दिली आहे.
कोण आहेत चंद्रिमा भट्टाचार्य?
चंद्रिमा भट्टाचार्य या तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि वजनदार नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पश्चिम बंगालमधील मागील तृणमूल सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे अर्थ आणि आरोग्य राज्यमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय पक्षाच्या महिला विंगच्या प्रमुख पदाधिकारी म्हणूनही त्यांनी संघटनात्मक पातळीवर मोठे काम केले आहे.
राज्यात तीन वेळा आमदार राहिलेल्या भट्टाचार्य यांना २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दमदम उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सौरव सिकदर यांनी त्यांचा २६,४०४ मतांच्या फरकाने पराभव केला.
या निवडणुकीत भट्टाचार्य यांना ७६,८८० मते मिळाली होती. चंद्रिमा भट्टाचार्य यांचा हा वैयक्तिक पराभव म्हणजे तृणमूल काँग्रेसची राज्यभरातील सुमार आणि खराब कामगिरीचेच प्रतीक मानला गेला होता. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोरील राजकीय संकट अधिक गडद झाले आहे.






