मामा-मामी मतदान करायचं हं ! शालेय विद्यार्थी आणि नवसाक्षर घालणार मतदारांना भावनिक साद

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी योजना शिक्षण संचालनालयाने शालेय विद्यार्थी व नवसाक्षर यांच्यासाठी व्हिडिओ निर्मिती आणि कौटुंबिक पत्रलेखन उपक्रम आयोजित केले आहेत.
मतदान जनजागृतीसाठी व्हिडिओ निर्मिती पत्रलेखनासाठी दोन मुख्यगट करण्यात आले आहेत. यात शालेय विद्यार्थी गटात इयत्ता ५ वी ते ८ वी , इयत्ता ९वी ते १२ वी असे उपगट आहेत. दुसरा नवसाक्षरांचा गट आहे. दोन्ही गटाच्या उपक्रमांसाठी आई-बाबा, आजी-आजोबा, काका-मावशी, मामा-मामी मतदान करायचं हं ! असा विषय देण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्रात कमी मतदान झाले होते. त्यामुळे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर योजना शिक्षण संचालनालयाने आयोजित केलेले दोन्ही उपक्रम अनोखे आहेत. योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत पत्राद्वारे याबाबत सूचना दिल्या आहेत.
कौटुंबिक पत्रलेखन सध्याच्या काळात मागे पडले आहे. त्याचा सराव व्हावा आणि मतदान जागृती व्हावी असे दोन्ही उद्देश ठेवून पत्रलेखन व व्हिडिओ निर्मिती या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कौटुंबिक पत्रलेखन द्वारे विद्यार्थी आई-वडिलांना घरातच समक्ष पत्र देऊन तर इतर नातेवाईकांना टपालाद्वारे पत्र पाठवून मतदान करण्याबाबत हट्ट धरतील.
नव साक्षरांनीही स्वयंसेवकांच्या मदतीने पत्र लिहिणे अपेक्षित आहे. शालेय विद्यार्थी व नव साक्षर यांनी मतदानाचे महत्त्व व्हिडिओच्या माध्यमातून पटवून देणे अपेक्षित आहे. याबाबत आचारसंहिताचे उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशस्तीपत्रे वितरित करणार…
नवसाक्षरांनी मतदान प्रक्रियेत शंभर टक्के मतदानाचा अधिकार बजावून कुटुंबातील इतर सदस्यांना व आप्त नातेवाईकांनाही मतदानासाठी प्रेरित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवसाक्षरांसह राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी कौटुंबिक पत्रलेखन व व्हिडिओ तयार करून सर्व पात्र मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्याविषयी सुचित केले आहे.
शाळा, तालुका, जिल्हा स्तरावर या दोन्ही उपक्रमात सर्वोत्कृष्ट प्रत्येकी पाच पत्रे आणि व्हिडिओ निर्मितीसाठी प्रशस्तीपत्रे निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.





