Mallikarjun Kharge : धनखड यांच्या राजीनाम्याचे कारण ठाऊक नाही; कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे वक्तव्य

बंगळुरू : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण मला ठाऊक नाही. तो विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यातील आहे. त्यामुळे नेमके काय घडले ते धनखड यांनीच सांगावे, असे सूचक भाष्य कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. धनखड यांनी नुकताच तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी अचानकपणे ते पाऊल उचलल्याविषयी विरोधकांकडून आणि प्रामुख्याने कॉंग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अशात कर्नाटकच्या विजयपूरमध्ये रविवारी पत्रकारांनी खर्गे यांना धनखड यांच्या राजीनाम्याविषयीचा प्रश्न विचारला. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलल्याने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले का, असे त्यांना विचारण्यात आले. त्यावर ते उत्तरले, राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने धनखड यांनी नेहमीच केंद्र सरकारची बाजू घेतली. शेतकरी, गरीब, महिलांवरील अत्याचार, परराष्ट्र धोरण आदींशी संबंधित विविध मुद्दे विरोधकांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, धनखड यांनी विरोधकांना मुद्दे मांडण्याची संधी दिली नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी राजीनामा देत असल्याचे धनखड यांनी नमूद केले. मात्र, त्यांच्या कृतीमागे त्या पलीकडेही बरेच काही असावे, अशी शक्यता विरोधकांच्या गोटातून वर्तवली जात आहे.




