Mallikarjun Kharge : निवडणूक आयोग मोदींच्या हातातील कळसुत्री बाहुला बनला आहे; कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार बदलण्यात आले. कर्नाटकमध्ये मतचोरी झाल्याचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही करत आहेत. आता कॉंग्रेसकडे पुरावा आहे. निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातील कळसुत्री बाहुला बनला आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी सोडले.
बिहारमधील मतदार याद्या पडताळणीवरून राजकारण तापले आहे. अशात खर्गे यांनी कॉंग्रेसकडून होणाऱ्या निवडणूक अनियमिततांचा आरोप लावून धरला. ते घटनात्मक आव्हाने या विषयावर आधारित कायदाविषयक संमेलनात बोलत होते. बिहारमधील पडताळणी प्रक्रियेच्या आधारे ६५ लाख मतदारांना मतदानापासून दूर ठेवले जाणार आहे. गरीब, अल्पसंख्याक, वंचित घटक भाजपच्या राजवटीला विटले आहेत. त्यांनी कॉंग्रेसला मतदान करण्याला पसंती दिली असती. त्यामुळे त्यांच्या मतदानाचा हक्क निवडणूक आयोग हिरावू पाहत आहे, असा शाब्दिक हल्लाबोल त्यांनी केला.
देशाची राज्यघटना केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून लोकशाहीचा आत्मा आहे. राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधूभावाचा अधिकार प्रदान केला आहे. मात्र, आज राज्यघटना धोक्यात आली आहे. सत्तेत असणारे नेते राज्यघटना बदलण्याची भाषा करत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० जागा जिंकल्या असत्या; तर राज्यघटनेत बदल केला गेला असता. मात्र, जनतेने ताकद दाखवत ४०० पार अशी घोषणा देणाऱ्यांना जोरदार चपराक लगावली. त्यामागे कॉंग्रेसची कामगिरीही महत्वाची आहे. तिचे श्रेय राहुल यांना जाते. त्यांनी राज्यघटना वाचवण्याची मोहीम हाती घेतली, असे प्रशंसोद्गारही खर्गे यांनी काढले.





