Malini Sharma : राज’मधली भूताची भूमिका साकारणारी मालिनी शर्मा पुन्हा चर्चेत; एका आठवड्यात फॉलोअर्समध्ये मोठी वाढ
Malini Sharma : त्यांनी चाहत्यांशी संवाद साधत मिळालेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार इंन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करत मानले आहेत.

Malini Sharma : २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘राज’ या हॉरर थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री मालिनी शर्मा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनंतर तब्बल दोन दशकांनी मालिनी शर्मा यांनी चाहत्यांसोबत संवाद साधला.
त्यांच्या बदललेल्या लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि काही वेळातच मालिनी यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला जाऊ लागला. याचा थेट परिणाम त्यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सवर झाला. त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून, या अनपेक्षित प्रतिसादामुळे मालिनी शर्मा यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी चाहत्यांशी संवाद साधत मिळालेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार इंन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करत मानले आहेत.
दोन दशकांनंतर चाहत्यांशी साधला संवाद
सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो, याची प्रचिती सध्या मालिनी शर्मा यांना येत आहे. ‘राज’नंतर अभिनयापासून काहीशा दूर गेलेल्या मालिनी यांनी तब्बल दोन दशकांहून अधिक काळानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.
मालिनी शर्मा यांचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामध्ये त्यांचा बदललेला लूक पाहायला मिळाला. त्यांच्या केसांचा रंगही पांढरा झालेला दिसत होता. हा लूक पाहून अनेक जुन्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर शोधण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यांना मोठ्या प्रमाणात मेसेज आणि फोनही येऊ लागले.
View this post on Instagram
मालिनी सध्या महाराष्ट्रातील एका रिसॉर्टमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. चाहत्यांकडून येणारे फोन आणि मेसेज वाढत गेल्याने अखेर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधला.
“तुम्ही लोकांनी खूप छान काम केलंय…”
व्हिडीओमध्ये मालिनी शर्मा यांनी चाहत्यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “तुम्ही लोकांनी खूप छान काम केलं आहे. मला याची अजिबात अपेक्षा नव्हती. माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. माझी फक्त एक छोटीशी विनंती आहे, इतके फोन सांभाळणे माझ्यासाठी कठीण होत आहे. तुम्ही इन्स्टाग्रामवर सतत मेसेज पाठवत आहात. मी तिथे प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.”
६४४ वरून थेट ३५ हजार फॉलोअर्स!
विशेष म्हणजे, मालिनी शर्मा यांच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर व्हायरल होण्यापूर्वी केवळ ६४४ फॉलोअर्स होते. मात्र, अवघ्या एका आठवड्यात त्यांच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास ३५ हजारांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे ही संख्या सातत्याने वाढत आहे.
‘राज’मधील भूमिकेने मिळवली रातोरात लोकप्रियता
‘राज’ चित्रपटात मालिनी शर्मा यांनी ‘मालिनी’ नावाच्या भूताची भूमिका साकारली होती. त्यांच्या दमदार अभिनयासोबतच त्यांच्या ग्लॅमरस अंदाजानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटात डिनो मोरिया आणि बिपाशा बसू यांच्यासोबत काम करताना मालिनी यांनी आपल्या भूमिकेची स्वतंत्र छाप पाडली. ‘राज’मधील त्यांच्या भूमिकेमुळे त्या रातोरात लोकप्रिय झाल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी अभिनयापासून अंतर राखले.





