श्री खंडोबा मंदिर गडावर राजमाता अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ‘मल्हार याग’, मेघडंबरीचे लोकार्पण

जेजुरी – जेष्ठ शुक्ल द्वादशी, शनिवार (दि. ०७) रोजी श्री खंडोबा मंदिर गडावर हिंदू धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी (३०० व्या) जयंती वर्षानिमित्त श्री मार्तंड देवसंस्थानतर्फे ३०० जोडप्यांच्या शुभहस्ते भव्य मल्हार यागाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील भाविक-भक्तांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
या सोहळ्याच्या वेळी महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, ॲड. विश्वास पानसे, अनिल सौंदडे आणि पोपट खोमणे यांनी सर्व यजमान आणि मान्यवरांचा सत्कार केला.
सोहळ्याचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे श्री खंडोबा मंदिर पायरी मार्गावरील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सजवण्यात आलेली भव्य मेघडंबरी. या मेघडंबरीचे लोकार्पण मंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी वर्ग आणि सेवेकरी वर्ग यांनी केले. हा सोहळा भाविकांमध्ये श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला. राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांच्या योगदानाला उजाळा दिला.

