पुणे जिल्हा: शेतकऱ्याची मुक्या प्राण्यांवर मायेची सावली; बैलांसाठी पेंढ्यापासून तयार केली “मेघडंबरी’

पेठ (दिलीप धुमाळ) – सध्या उन्हाळा प्रचंड वाढला आहे, अशा वेळी आपल्या पशुधनाचे तीव्र उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पेठमधील शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने त्यांच्यावर मायेची सावली धरली आहे. बैलगाड्यांसाठी असलेल्या बैलांसाठी पेंढ्यापासून मेघडंबरी बनवली असून, त्यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
पेठ (ता. आंबेगाव) येथील शेतकरी दिलीपराव पवळे यांनी उन्हाळ्यात बैलांच्या सावलीसाठी ज्वारीचा कडबा, बांबू, वडाच्या पारंब्यांपासून बनवलेला मांडव तयार केला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग लगत पूर्वेला वायरलेस पोलीस केंद्राजवळ पवळे यांनी यावर्षी रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती साकारली आहे.
बैलगाडा शर्यतीच्या बैलांसाठी हा मांडव तयार केला असून, या मांडवासाठी ज्वारीचा कडबा, बांबू आणि वडाच्या पारंब्यांचा वापर केला आहे. सलग 24 वर्षांपासून अशा प्रकारचा मांडव दरवर्षी उन्हाळ्यात ते बनवतात. सध्या येथे सहा बैल आणि एक घोडी आहे. या मांडवावर शिवराजमुद्रा, ढाल-तलवारी, तोफांची प्रतिकृती बसवली आहे. बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला सध्या आलेली बळकटी आली आहे. या मांडवाजवळ बैलगाडा शर्यतीला शासनाने लावलेल्या नियम अटीचे फलक लावले आहेत. यामुळे जनजागृती होऊन एकप्रकारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
मांडव बांधण्यास अडीच महिन्यांचा कालावधी
हा मांडव बनवण्यासाठी तब्बल 1600 हून अधिक ज्वारी कडब्याच्या पेंढ्या, तीनशेहून अधिक बांबू, पारंब्यांचा वापर केला असून, हा मांडव बांधण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागला.





