मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समितीची बैठक

क्वालालंपूर, (मलेशिया) : मलेशियात क्वालालंपूर येथे आज मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समितीच्या १३ व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि मलेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव लोकमान हकीम बिन अली यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. अलीकडच्या काळात दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील नियमित सहभागासह वाढत्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबद्दल दोन्ही बाजूंनी आनंद व्यक्त करण्यात आला.
द्विपक्षीय संरक्षण भागीदारी आणि प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांचा विस्तार करण्यासाठी प्रभावी आणि व्यावहारिक उपक्रमांवर दोन्ही बाजूंकडून विस्तृत चर्चा करण्यात आली. दोन्ही सह-अध्यक्षांनी सायबर सुरक्षा आणि एआय सारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वाढवण्यासाठी आवश्यक असलेली पावले विचारात घेतली. त्यांनी सध्या ज्या क्षेत्रात सहकार्य सुरू आहे, विशेषतः संरक्षण उद्योग, सागरी सुरक्षा आणि बहुपक्षीय भागीदारींमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्याचे मार्ग विचारात घेतले. अपारंपारिक सागरी सुरक्षा धोक्यांना तोंड देण्यासाठी एक संयुक्त केंद्रित गट तयार करण्याबाबत त्यांनी सहमती दर्शविली.
भारत आणि मलेशियाने धोरणात्मक व्यवहार कार्य गटाच्या स्थापनेसंदर्भात अंतिम केलेल्या संदर्भाच्या अटींची देखील दोन्ही बाजूंनी देवाणघेवाण केली. भारताच्या हिंद-प्रशांत दृष्टीकोनाचा एक महत्त्वाचा भाग असलेली असियान केंद्रितता आणि एकता यांना भारत पाठिंबा देत आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रातील नव्याने आकाराला येत असलेल्या घडामोडींमध्ये मध्यवर्ती भूमिका असलेल्या असियान संघटनेला अधिक भक्कम, एकसंध आणि समृद्ध बनवण्यासाठी मलेशियाकडून होत असलेल्या प्रयत्नांना भारताच्या पाठबळाचा संरक्षण सचिवांनी पुनरुच्चार केला.



