मलाला यूसुफझाई जगातील ‘सर्वात प्रसिद्ध किशोरी’

संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा
नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफझाई यांना ‘डिकेड इन रिव्यू’ अहवालात ‘जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन’ घोषित केले आहे. २०१० च्या मध्यापासून ते २०११ अखेरच्या कार्यक्रमांचा समावेश या अहवालात करण्यात आला. द न्यूज इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, यात २०१० मधील हैतीमधील भूकंप, २०११ मधील सिरियन संघर्ष आणि २०१२ मधील मलाला यूसुफझाई यांनी मुलींना शिक्षित करण्याच्या मोहिमेचा समावेश होता.
२०१४ मध्ये मलालाला नोबेल पारितोषिक (शांती) देण्यात आले. हा पराक्रम गाठणारी मलाला ही सर्वात कमी वयाची तरुणी आहे. तालिबानी अतिरेक्यांनी मलालाच्या डोक्यातही गोळ्या झाडल्या होत्या. असे असूनही, ती मुलींच्या शिक्षणासाठी काम करत राहिली.
संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालात लिहिले आहे की, “मलालावरील या हल्ल्याचा संपूर्ण जगाने निषेध केला. त्याचवर्षी मानवी हक्क दिनाच्या दिवशी पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात या घटनेविरूद्ध एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर मुलींनी शाळेत जाण्याचा अधिकार आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यावर भर दिला गेला.
अहवालात असेही म्हटले होते की, या प्राणघातक हल्ल्यानंतर मलालाचे आणखी वलय वाढले. यानंतर, सन २०१७ मध्ये मुलींचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवून मलालाला यूएन’ने शांतिदूत म्हणून बनवले. २२ वर्षीय मलाला अलीकडेच टीन वोग मॅगझिनने ‘कव्हर परफॉरमन्स’साठी निवडले होते.





