Malaika Arora: बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अरबाज खानसोबतच्या लग्नानंतर जवळपास दोन दशकं एकत्र राहूनही हे नातं पुढं टिकू शकलं नाही. २०१६ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी अधिकृतरीत्या घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायकाने अनेकदा या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मन मोकळं केलं. एका चॅनेलशी संवाद साधताना मलायका म्हणाली, “माझं लग्न आयुष्यभर टिकावं, अशी माझी मनापासून इच्छा होती. पण याचा अर्थ असा नाही की माझा प्रेमावरचा विश्वास उडाला आहे. याचा अर्थ असा नाही की मी मोठी चूक केली आहे, किंवा माझं आयुष्य वेगळ्या मार्गाने गेलं असतं तर काहीतरी बदललं असतं. जे घडायचं होतं ते घडलं.” तिने पुढे सांगितलं की, “आमच्या नात्यात काहीतरी सुधारावं, सकारात्मकता यावी यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र एक क्षण असा आला की हे नातं पुढं टिकणार नाही, हे स्पष्ट झालं. त्यावेळी मला जाणवलं की स्वतःचा विचार करणं आवश्यक आहे. मी आनंदी नव्हते आणि म्हणूनच घटस्फोटाचा निर्णय घेतला.” मलायकाने यावेळी ‘स्वार्थी’ ठरवल्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. “माझ्या त्या निर्णयानंतर मला अनेकांनी स्वार्थी म्हटलं. पण खरं सांगायचं तर स्वतःसाठी निर्णय घेणं हे स्वार्थीपणाचं लक्षण नाही. जेव्हा तुम्ही पालक असता, तेव्हा स्वतः आनंदी असणं महत्वाचं असतं, कारण त्यातूनच तुम्ही मुलांसाठी आणि कुटुंबासाठी चांगलं करू शकता. मी स्वतःचा विचार केला, कारण त्यावेळी मी तुटलेली होते.” आज या प्रवासाकडे पाहताना मलायकाला समाधान वाटतं.ती म्हणाली,“त्या निर्णयामुळे मी अधिक समजूतदार, स्थिर आणि शांत झाले. आज मी स्वतःशी समाधानी आहे, माझं मूलही आनंदी आहे. नातं टिकवायचं नसेल, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यात काहीही चुकीचं नाही. परिपक्वतेचं लक्षण म्हणजे आदर राखून वेगळं होणं.” १९ वर्षांच्या सहजीवनानंतर घेतलेल्या या निर्णयाबद्दल मलायका अरोराची ही प्रामाणिक प्रतिक्रिया पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.