Makrand Patil: वाईला ३५२ कोटींचा निधी! ४३ किमी काँक्रिट रस्त्याला मंजुरी; मकरंद पाटलांच्या पाठपुराव्याला यश
Makrand Patil: मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून कान्हवडी-खंडाळा-लोणंद १० मीटर रुंद काँक्रिट रस्ता मंजूर; ग्रामीण विकासाला मिळणार गती.

Makrand Patil: वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात कान्हवडी-खंडाळा-लोणंद हा 43 किमी लांबीचा व दहा मीटर रुंदीचा काँक्रिट रस्ता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी तब्बल 352 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. ना. मकरंद पाटील यांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला. प्रशासकीय अडथळे, निधी आणि विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव या सर्व आव्हानांवर मात करत,
त्यांनी या रस्त्याला मंजुरी मिळवून दिली आहे. या रस्त्याचे काम झाल्यावर शेतमालाची वाहतूक सुलभ होणार असून, या भागातील उद्योग-व्यवसायांना गती मिळेल. नागरिक व विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होऊन, ग्रामीण भागाच्या विकासाला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खंडाळा आणि खंबाटकी घाट परिसरात अनेक भीषण अपघात झाले आहेत.
अपघातानंतर जखमींना वेळेत उपचार मिळावे यासाठी खंडाळा येथे ट्रॉमा केअर सेंटरची इमारत पूर्णत्वास आली असली, तरी या सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधा आवश्यक असल्याची बाब त्यांनी शासनासमोर प्रभावीपणे मांडली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, ट्रॉमा केअर सेंटरमधील अंतर्गत कामे आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी दोन कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळणार आहेत.
फक्त आश्वासने न देता विकास करणारे नेतृत्व
कान्हवडी-खंडाळा-लोणंद काँक्रिट रस्ता आणि खंडाळा येथील ट्रॉमा केअर सेंटरसाठी निधी मंजूर झाल्याने, ना. मकरंद पाटील यांचे नेतृत्व जनतेला केवळ आश्वासने देणारे नसून, प्रत्यक्षात विकास करणारे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.





