पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रारूप यादीमध्ये मतदारांनी आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. या पार्श्वभूमीवर मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आपली नावे मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात ६ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. \१ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या व मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव न नोंदविलेल्या नागरिकांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. तसेच मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील देखील अचूक असल्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे. १ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच ज्या मतदारांची नावे वगळली गेलेली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादी मध्ये नाहीत अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक ६ भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी https://voters.eci.gov.in हे संकेतस्थळावर अर्ज भरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.