पुणे | सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प बंधनकारक करा

पुणे,{प्रभात वृत्तसेवा}– खडकवासला धरणसाखळी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निवासी तसेच व्यावसायिक बांधकामे झालेली आहेत. येथील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट धरणात सोडले जात आहे. परिणामी, धरण आणि नदीतील पाणी प्रचंड प्रदूषित झालेले असून, शहर आणि ग्रामीण भागात आरोग्य तसेच शेतीवर दुष्परिणाम होत आहेत.
मोसी, मुठा आणि आंबी या नद्यांवर वरसगाव, पानशेत, खडकवासला धरण आहे. पानशेत धरण परिसर ते खडकवासलापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड प्रमाणात नागरीकरण झाले आहे. नदीकिनारी दोन्ही बाजूंनी मोठमोठे पंचतारांकित रिसॉर्ट्स, हॉटेल तसेच फार्महाऊस उभे करण्यात आले आहेत. त्यांचे ड्रेनेजचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडले जात आहे.
तर, ग्रामपंचायतीकडे स्वतःचे मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प नाहीत. ही बाब लक्षात घेऊन याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भाजप शहर उपाध्यक्ष हरिदास चरवड यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांतील गाळ काढल्यास धरणांची क्षमता वाढणार असून, महापालिकेसही भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करण्यास मदत होणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच पाणलोट क्षेत्रात नव्याने होणार्या बांधकामांना सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प बंधनकारक करावेत. त्यासाठी तातडीने सर्वेक्षण करून उपाययोजना कराव्यात, असे चरवड यांनी म्हटले आहे.




