Tomato Sauce Recipe: बाजारातील सॉसला म्हणा बायबाय; घरच्या घरी बनवा हेल्दी टोमॅटो सॉस
Tomato Sauce Recipe घरगुती टोमॅटो सॉस चविष्ट असण्यासोबतच पूर्णपणे शुद्ध आणि आरोग्यदायी असतो. विशेष म्हणजे तो बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही. फक्त २० मिनिटांत स्वादिष्ट आणि हेल्दी टोमॅटो सॉस तयार होऊ शकतो.

Tomato Sauce Recipe: आजकाल बाजारात मिळणाऱ्या टोमॅटो सॉसमध्ये भेसळ, कृत्रिम रंग आणि जास्त प्रमाणात केमिकल्स वापरले जात असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये मुलांच्या आरोग्याबाबत चिंता वाढत आहे. अनेक मुलांना टोमॅटो सॉस खूप आवडतो, पण बाजारातील सॉसमध्ये जास्त साखर, प्रिझर्वेटिव्ह आणि कृत्रिम रंग असू शकतात. अशा वेळी घरच्या घरी तयार केलेला टोमॅटो सॉस हा उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो.
घरगुती टोमॅटो सॉस चविष्ट असण्यासोबतच पूर्णपणे शुद्ध आणि आरोग्यदायी असतो. विशेष म्हणजे तो बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही. फक्त २० मिनिटांत स्वादिष्ट आणि हेल्दी टोमॅटो सॉस तयार होऊ शकतो. आपल्या आवडीनुसार त्यामध्ये गोडवा आणि मसालेही कमी-जास्त करता येतात.
टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य अगदी सोपे आहे. यासाठी एक किलो लाल पिकलेले टोमॅटो, दोन चमचे साखर, चवीनुसार मीठ, अर्धा कप व्हिनेगर, थोडी लाल तिखट पावडर, दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि आवडीनुसार काळी मिरी व दालचिनी लागते.

Tomato Sauce Recipe
सॉस बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचे छोटे तुकडे करावेत. नंतर हे टोमॅटो एका भांड्यात घालून १० ते १५ मिनिटे उकळावेत. टोमॅटो मऊ झाल्यानंतर गॅस बंद करून ते थंड होऊ द्यावेत. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पेस्ट तयार करावी. अगदी स्मूथ सॉस हवा असल्यास ही पेस्ट गाळून घ्यावी.
यानंतर टोमॅटोची पेस्ट कढईत टाकून मंद आचेवर शिजवायला ठेवावी. त्यामध्ये साखर, मीठ, लाल तिखट आणि इतर मसाले घालावेत. सॉस खाली लागू नये म्हणून सतत ढवळत राहावे. साधारण १५ ते २० मिनिटांनंतर सॉस घट्ट होऊ लागतो आणि त्याचा छान सुगंध येऊ लागतो.
सॉस घट्ट झाल्यावर त्यात व्हिनेगर घालावे. यामुळे सॉस जास्त दिवस टिकून राहण्यास मदत होते. आणखी पाच मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करून सॉस पूर्णपणे थंड होऊ द्यावा.
थंड झालेला सॉस स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवावा. योग्य स्वच्छता पाळल्यास हा सॉस दोन ते तीन महिने सहज टिकू शकतो. घरचा बनवलेला हा टोमॅटो सॉस समोसे, पकोडे, फ्रेंच फ्राइज किंवा मुलांच्या स्नॅक्ससोबत खूपच स्वादिष्ट लागतो.
आरोग्यदायी आणि भेसळमुक्त खाण्याचा पर्याय निवडायचा असेल, तर घरच्या घरी बनवलेला टोमॅटो सॉस नक्की करून पाहावा.





