पुणे जिल्हा | ग्रामविकास अधिकाऱ्यास बायोमेट्रिक सक्तीची करा

वालचंदनगर, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये सरपंचाप्रमाणे ग्रामसेवक हे पदही महत्त्वाचे असुन ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी आपल्याला दिलेल्या वेळात हजर राहत नसल्याने ग्रामस्थांची ग्रामपंचायतीमधील कामे प्रलंबित राहतात.
ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक बऱ्याच वेळा ग्रामपंचायत कार्यालयात भेटत नाही गावात येत नाही यासह अन्य कारणांची ओरड असते. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बायोमेट्रिकची हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भीमसेन उबाळे यांनी केली आहे.
तालुक्यात गावागावांमधील ग्रामस्थांची कामे वेळेवर होत नाही.याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना व मजुर वर्गाला बसतो. ग्रामसेवकासह ग्रामविकास अधिकारी, (तलाठी, कृषी सहायक, आरोग्य खात्यातील कर्मचारी,
पशुवैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी) वेळेत कधीच उपस्थित नसल्याचे याबाबत काही सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ग्रामसेवक, तलाठी यांच्यासाठी बायोमेट्रीक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी केली यापूर्वी होती.
त्यानंतर शासनाने याबाबत निर्णय घेत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाप्रमाणे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू झाल्याने कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांना चांगलाच चाप बसणार आहे.
याबाबत ग्रामविकास विभागाने तसे आदेश जिल्हा परिषद स्तरावर दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी आपल्या कार्यक्षेत्रातील इंदापूर तालुक्यामधील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तंतोतंत व्हावी व इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांना योग्य तो न्याय आपल्या आदेशाने मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता भिमसेन उबाळे यांनी पत्राद्वारे इंदापूर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी यांचेकडे केली आहे .
ग्रामविकासाला फायदा…
बायोमेट्रीक हजेरी सक्तीची केल्यास ग्रामविकासाला होणार हे फायदे ही त्यांनी यामध्ये नमूद केलेले आहेत. बायोमेट्रीक हजेरी सक्तीची केल्यास ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना गावात येणे सक्तीचे राहणार आहे.
हजेरीसाठी गावात आल्यावर, ग्रामपंचायतींत उपस्थिती वाढणार. पर्यायाने ग्रामस्थांची कामे वेगाने होणार असून या सह अन्य फायदे तालुक्यातील ग्रामस्थांना बायोमॅट्रिकमुळे होणार आहेत.





