पुणे – अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बहुतांश वसतिगृहाची क्षमता ही केवळ शंभर विद्यार्थी आहे. त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी नवीन वसतिगृहाची निर्मिती ही कमीत कमी दीडशे ते दोनशे व जास्तीत जास्त हजार विद्यार्थी क्षमता असलेले निर्माण करा. वसतिगृह महाविद्यालयाच्या जवळपास निर्माण करा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल, असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक गतिमान करून वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वेळेत मिळण्यासाठी तत्परतेने कार्य करावे. प्रत्येक अधिकाऱ्यांनी कार्य करताना आपल्या विभागाविषयी लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचला पाहिजे, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे निर्देश प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले