Maharashtra : राज्यात मुसळधार कायम; पुणे, ठाणे, रायगड व पालघरला रेड अलर्ट…

मुंबई :- गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील सर्वच भागात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सावित्री, वाशिष्टी, अंबा अशा काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचमुळे आता रायगड, पुण्यासह ठाणे पालघर जिल्हांना पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, खानदेशात पावसाची संततधार सुरू असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून विदर्भात जोर कायम आहे. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, या भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली भागात पावसाने दमदार हजेरी लावली.
कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित विदर्भासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मंगळवारी रात्रीपासून 34 जिल्ह्यांत जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. विशेषत: कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात पावसामुळे नद्यांना आला. बुधवारी राज्यात सरासरी 10.5 मिमी पाऊस अपेक्षित होता, मात्र प्रत्यक्षात 39.1 मिमी म्हणजे 269 टक्के जास्त पावसाची नोंद झाली.
मुंबई, ठाणे, रायगडला फटका…
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत पावसाचा फटका बसला. मुंबईत लोकल विस्कळीत झाल्याने हाल झाले. भांडूपमध्ये घराचा स्लॅब कोसळून 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर भिवंडीत 14 वर्षीय मुलगी वाहून गेली. विदर्भातील चिखलदरा तालुक्यातील मोरगड शिवारात वीज पडून सुनील (32) व नीलेश भास्कर (20) हे काका-पुतणे ठार झाले. धुळे जिल्ह्यात पावसामुळे विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला.
कोकणात धुमशान…
कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि संततधार सुरू आहे. किनारपट्टीच्या तालुक्यांत वादळी वारा आणि पावसाचा जोर अधिक आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे इर्शाळवाडीतील घटनेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले आहेत. या जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात संततधार..
खानदेशातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी असला तरी अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. नगर, पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. विशेष म्हणजे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांतील पाण्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक भागांत हलका तर, काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली.





