CSK Team : CSK मध्ये मोठे फेरबदल! पाच दिग्गजांचा टीमला रामराम
CSK Team : चेन्नई सुपर किंग्सने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली.

CSK Team : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये महेला जयवर्धने यांच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून कायरन पोलार्डची नियुक्ती करण्यात आली. चेन्नई सुपर किंग्सने देखील आपल्या कोचिंग स्टाफमधील पाच सदस्यांना निरोप दिला आहे. संघाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे चेन्नईच्या कोचिंग टीममध्ये मोठे फेरबदल झाल्याचे दिसत आहे. यामध्ये फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी, गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स, सहाय्यक प्रशिक्षक राजीव कुमार, फिजिओ टॉमी सिमसेक आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच ग्रेग किंग यांचा समावेश आहे.
मायकेल हसी यांच्यासाठी खास पोस्ट
चेन्नई सुपर किंग्सने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली. २००८ मध्ये आयपीएलचा पहिला हंगाम सुरू झाल्यापासून हसी यांचे चेन्नई संघाशी जवळचे नाते राहिले आहे. खेळाडू म्हणून तसेच प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हसी यांचे आभार मानताना चेन्नईने त्यांच्या समर्पण, नम्रता आणि संघाप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव केला. पिवळ्या जर्सीतील त्यांचा प्रवास केवळ धावा आणि खेळाडूंना दिलेल्या मार्गदर्शनापुरता मर्यादित नसून, त्यांनी फ्रँचायझीसाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांचे स्थान नेहमीच खास राहील, असे म्हटले.
एरिक सिमन्स यांनाही निरोप
चेन्नईच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी सांभाळणारे एरिक सिमन्स यांचाही निरोप देण्यात आलेल्या सदस्यांमध्ये समावेश आहे. २०१८ पासून ते संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. गोलंदाजांना घडवण्यात आणि संघाच्या यशात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाची दखल घेत चेन्नईने आभार व्यक्त केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Official Announcement:
Every successful campaign is built on countless hours of preparation, discipline, and hard work. Greg King, your expertise in strength and conditioning has helped our Super Kings overcome physical challenges and perform at the highest level across seasons.
We appreciate everything you have brought to the Yellow Army, Greg King.
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 26, 2026
राजीव कुमार यांचीही एक्झिट
संघाचे सहाय्यक प्रशिक्षक राजीव कुमार यांचाही चेन्नईसोबतचा प्रवास थांबला आहे. संघाची तयारी, खेळाडूंचा विकास आणि कामगिरीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. खेळाडूंना मार्गदर्शन करण्यापासून ते संघाचा पाया मजबूत करण्यापर्यंत त्यांच्या कामाचा मोठा वाटा होता. चेन्नईने त्यांच्या समर्पित सेवेबद्दल आभार मानत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
टॉमी सिमसेक आणि ग्रेग किंग यांचाही निरोप
चेन्नई सुपर किंग्सचे फिजिओ टॉमी सिमसेक हे २००८ पासून संघाशी जोडलेले होते. खेळाडूंची तंदुरुस्ती राखणे, दुखापतींमधून सावरण्यास मदत करणे आणि त्यांना सामन्यांसाठी सज्ज ठेवणे, अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. संघाच्या सुरुवातीच्या काळातील अनुभवी खेळाडूंच्या तंदुरुस्तीमध्येही त्यांचे योगदान महत्त्वाचे होते.
याशिवाय, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच ग्रेग किंग यांनीही चैन्नई संघासोबतचा आपला प्रवास संपवला आहे. खेळाडूंची शारीरिक क्षमता वाढवणे आणि संपूर्ण हंगामात त्यांची कामगिरी टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी काम केले.
झहीर खानकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
चेन्नईच्या कोचिंग स्टाफमधील या बदलांमुळे संघाच्या आगामी हंगामातील रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झहीर खान यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता चेन्नई सुपर किंग्स नव्या कोचिंग सेटअपसह आगामी हंगामात कशी कामगिरी करते, याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.





