Ramesh Pardeshi : ‘मुळशी पॅटर्न’च्या पिट्याभाईवर भाजपची मोठी जबाबदारी; रमेश परदेशींची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
Ramesh Pardeshi : या नियुक्तीची अधिकृत घोषणा पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली.

Ramesh Pardeshi : ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘पिट्याभाई’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेता रमेश परदेशी यांच्यावर भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. रमेश परदेशी यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीची अधिकृत घोषणा पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली. रमेश परदेशी यांच्या नव्या जबाबदारीबद्दल मोहोळ यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “अभिनंदन रमेश…. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या प्रदेश संयोजकपदी निवड झाल्याबद्दल सुप्रसिद्ध अभिनेते आणि माझे मित्र रमेश परदेशी यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!”
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक क्षेत्राचे उत्तम संघटन होईल आणि पक्षाचा विचार विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रमेश परदेशी महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.
मनसे सोडून भाजपमध्ये प्रवेश
रमेश परदेशी यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशाला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार असून, त्याआधीच पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
रमेश परदेशी यांच्यासोबत पुण्यातील मनसे चित्रपट सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजकपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.





