IAS Tina Dabi: प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी टीना डाबींकडून ‘मोठी चूक’; व्हिडिओ व्हायरल होताच दिले ‘हे’ स्पष्टीकरण
IAS Tina Dabi: प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान झालेल्या एका ‘मानवीय चुकी’मुळे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

IAS Tina Dabi: राजस्थानमधील प्रसिद्ध आयएएस अधिकारी आणि बाडमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान झालेल्या एका ‘मानवीय चुकी’मुळे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नेमकी घटना काय?
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बाडमेर जिल्हा मुख्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी म्हणून टीना डाबी यांनी तिरंगा फडकवला. मात्र, ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि सलामी देण्याची वेळ आली असता, टीना डाबी (Tina Dabi) क्षणभरासाठी गोंधळल्या आणि चुकीच्या दिशेला तोंड करून सलामी देऊ लागल्या.
त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका जवानाच्या ही बाब त्वरित लक्षात आली. जवानाने अत्यंत सावधगिरीने इशारा केल्यानंतर टीना डाबी यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःला सावरले आणि योग्य दिशेला वळून प्रोटोकॉलनुसार सलामी दिली.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण –
ही घटना केवळ काही सेकंदांची होती, तरीही तिथे उपस्थित असलेल्या कुणीतरी हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्समध्ये दोन गट पडले आहेत.
काही जण याला ‘प्रोटोकॉलचे उल्लंघन’ म्हणत टीका करत आहेत, तर काहींनी टीना डाबी यांची पाठराखण केली आहे. “मोठ्या कार्यक्रमाच्या नियोजनाचा ताण असतो, अशा वेळी मानवी स्वभावानुसार अशी छोटी चूक कोणाकडूनही होऊ शकते,” असे मत समर्थकांनी व्यक्त केले आहे.
स्वतः टीना डाबी यांनी दिली स्पष्टोक्ती –
या प्रकरणावर चर्चा वाढू लागल्यानंतर खुद्द टीना डाबी यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “ही पूर्णपणे अनवधानाने झालेली चूक होती. कार्यक्रमाची व्यस्तता आणि व्यवस्थेकडे लक्ष देत असताना काही क्षणांसाठी दिशाभ्रम झाला होता. चूक लक्षात येताच मी त्यात त्वरित सुधारणा केली.”






