पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी वाहतुकीत मोठे बदल

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक विभागाने येरवडा, विश्रांतवाडी आणि हडपसर परिसरात वाहतुकीत बदल केले आहेत. पुण्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये आणि मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.
येरवडा – विश्रांतवाडी परिसर
आज या भागात १०३ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार असून त्या गुंजन चौक – पर्णकुटी चौक – तारकेश्वर चौक मार्गे चिमा विसर्जन घाट येथे जाणार आहेत. शादल बाबा चौक ते तारकेश्वर चौक हा मार्ग मिरवणुकीदरम्यान बंद ठेवण्यात येणार असून वाहतुकीचे पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे .
- शादल बाबा चौकातून तारकेश्वरकडे जाणारी वाहने → आंबेडकर चौक – गोल्फ क्लब चौक – शास्त्रीनगर चौक – नगर रोड मार्गे वळवली जातील.
- तारकेश्वरकडून शादल बाबा चौकाकडे जाणारी वाहने → पर्णकुटी चौक – गुंजन चौक मार्गे वळवण्यात येतील.
हडपसर परिसर
हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १५ नंबर परिसरात सायं. ५ वाजेपर्यंत मिरवणुका होणार आहेत.
- लक्ष्मी कॉलनी ते रविदर्शन (२ मंडळे)
- लक्ष्मी कॉलनी – १५ नंबर टर्न – लक्ष्मी कॉलनी (१ मंडळ)
- या मार्गांवर सिंगल लाईन ट्रॅफिक ठेवण्यात येणार असून वाहनांची गती मंदावणार आहे.
- पुणे–सोलापूर मार्गावरील वाहतूक तसेच लोणी ते सासवड जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- पर्यायी मार्ग: फुरसुंगी फाटा – फुरसुंगी – सासवड रोड
विशेष व्यवस्था
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाला विशेष सेवा पुरविण्याचे निर्देश वाहतूक विभागाने दिले आहेत.





