पाकिस्तानमध्ये मोठी दुर्घटना; इस्लामाबाद एक्सप्रेसचे १० डबे रुळावरून घसरुन ३० प्रवासी जखमी

Pakistan Railway Accident | पाकिस्तानमधील लाहोरजवळ शुक्रवारी सायंकाळी इस्लामाबाद एक्सप्रेसला भीषण अपघात झाला आहे. शेखूपुरा आणि मुरीदके दरम्यान काला शाह काकू येथे इस्लामाबाद एक्स्प्रेसचे सुमारे १० डबे रुळावरून घसरले. यात ३० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.
लाहोरहून रावळपिंडीकडे निघालेली ही ट्रेन लाहोरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शेखुपुरातील काला शाह काकू भागात रुळावरून घसरली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, रेल्वे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. Pakistan Railway Accident |
जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश
जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सर्व जखमींना मुरीदके टीएचक्यू आणि शाहदरा शिक्षण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शाहदराहून जनरल रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रेल्वे सूत्रांनी सांगितले की, अपघातस्थळी रेल्वे ट्रॅकचे तुटलेले तुकडे आढळले आहेत. अपघाताच्या वेळी ट्रेन 105 किमी/तास वेगाने धावत होती. ट्रेनचा वेग जास्त असल्याने आणि टो चेन उघडल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रेल्वे अपघाताबद्दल दुखः व्यक्त केले आहे. त्यांनी बचाव पथकांना तात्काळ मदत कार्य सुरू करण्याचे आणि सर्व प्रभावित प्रवाशांना त्वरित बाहेर काढून सहाय्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले आहेत आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण समोर आलेले नसले तरी अधिकाऱ्यांनी सात दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. Pakistan Railway Accident |
हेही वाचा :
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला न्यायालयाचा दणका, बलात्कार प्रकरणी दोषी; आज ठोठावणार शिक्ष





