Ship Capsized : समुद्रात मोठी दुर्घटना! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू
Ship Capsized : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. तब्बल २७० प्रवाशांना घेऊन जाणारी कॅटामरान प्रकारची प्रवासी फेरी बोट समुद्रात अचानक उलटली.

Ship Capsized : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. तब्बल २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी फेरी बोट अचानक उलटल्याने एकच खळबळ उडाली. किनाऱ्यापासून काही अंतरावर असताना बोटीमध्ये पाणी शिरू लागले आणि त्यानंतर बोट उलटल्याची माहिती समोर आली आहे. (Ship Capsized)
घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि बचाव पथके दाखल झाली असून, आतापर्यंत १०० हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Ship Capsized)
चार मैल अंतरावर बोट उलटली
कॅटामरान प्रकारची ही फेरी बोट उत्तर सायप्रसमधील किरेनिया बंदरातून तुर्कीच्या मेर्सिन प्रांतातील ताशुकचू बंदराच्या दिशेने निघाली होती. प्रवास सुरू केल्यानंतर बोट किनाऱ्यापासून सुमारे चार मैल अंतरावर गेली असताना त्यात अचानक पाणी शिरू लागले. पाणी मोठ्या प्रमाणात भरल्यानंतर बोटीचा तोल गेला आणि ती समुद्रात उलटली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. (Ship Capsized)
१०० हून अधिक प्रवाशांची सुटका
उत्तर सायप्रसचे परिवहन मंत्री एर्हान अरिकली यांनी बोट उलटल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत १०० हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून, त्यांना किरेनिया येथे आणण्यात आले आहे. (Ship Capsized)
उत्तर सायप्रसच्या आरोग्य मंत्रालयानेही आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली असून, आवश्यक वैद्यकीय मदत देण्यासाठी तयारी करण्यात आल्याचे सांगितले आहे. (Ship Capsized)
जीवितहानीबाबत अद्याप माहिती नाही
या दुर्घटनेनंतर किरेनिया आणि ताशुकचू या मार्गावरील फेरी वाहतूक काही काळ चर्चेत आली आहे. या व्यस्त मार्गावर अनेक कंपन्या फेरी सेवा चालवतात. मात्र, दुर्घटनाग्रस्त बोट नेमकी कोणत्या कंपनीच्या मालकीची आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Ship Capsized)
दरम्यान, दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, समुद्रात उलटलेल्या बोटीचे आणि सुरू असलेल्या बचावकार्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. बचाव पथकांकडून अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. (Ship Capsized)





