ग्रामीण भागातील पालकांना मैथिलीची भुरळ; 51 देशांसह भौगोलिक माहिती अगदी तोंडपाठ

कोरेगाव भीमा – करोना काळात विद्यार्थ्यांची ऑनलाइन शाळा व मुलांच्या अभ्यासविषयी चिंता सतावत आहे. परंतु वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथे चालता बोलता भौगोलिक माहिती सांगणाऱ्या मैथिलीचे ज्ञान परदेशी ग्रामीण भागातील पालकांना चक्क भुरळ पाडत आहे.
पावणे पाच वर्षांच्या कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या चिमुकलीचे युरोप खंडातील 51 देश, भारतातील 41 नद्यांची नावे, भारतातील राज्य, केंद्रशासित प्रदेश त्यांच्या राजधानी तसेच महाराष्ट्रातील 36 जिल्हे व 358 तालुक्यांची नावे तोंडपाठ आहेत.
तुम्ही फक्त जिल्हा सांगा ती त्यातील सर्व तालुक्यांची नावे अगदी भरभर सांगते. त्याच बरोबर ही चिमुरडी कॅरम, बुद्धिबळ व इतर खेळ खूप छान खेळते. तिला भक्तीगीते व गाणीही तालासुरात गाता येतात. हरहुन्नरी असणाऱ्या मैथिलीने 6 मिनिटे 40 सेकंदात 358 तालुक्यांची नावे तोंड पाठ सांगण्याचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम केला आहे. याबद्दल तिला 9 एप्रिल 2021 रोजी प्रमाणपत्रही दिले आहे.
मैथिलीला मराठी-इंग्रजी लिहिता व वाचता येतात. अभ्यासाचा सुरू झालेला हा प्रवास फक्त यावरच थांबत नाही तर तिला औषधांची जेनेरिक नावे त्याच्या 14 प्रकारांनुसार येतात. जसे की सेफॅलोस्पोरीन (पाच ही जनरेशन्स), अमायनोग्लायकोसाइड, मॅक्रोलिड, अँटीफंगल, कार्डिओव्हॅस्कुलर ड्रग्स, नॉन-स्टिरॉइडल अँटी-इंफ्लामेंटरी ड्रग्स या सर्व 14 प्रकारातील एकूण 175 औषधांची नावे तिला सांगता येतात. जी नावे पाठ करताना वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप कठीण जाते. ती नावे ती अगदी भरभर घेते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चिमुकलीने शाळेमध्ये प्रवेश न करता हे सर्व साध्य केलंय. तिला ना फळा, ना शिक्षक ना अभ्यास, ना मार्क याशिवाय तिने हे फक्त आवड आणि पालकांची साथ यामुळे हे साध्य केले आहे
“लहान मुलांच्या बौद्धिक क्षमतेची वाढ होत असताना त्यांच्यावर केले जाणारे अभ्यासाचे संस्कार हे त्यांना जन्मभर प्रेरणादायी असतात. कारण या वयात मुलांची पाटी कोरी असते. त्यावर जर हे संस्कार रुजवले तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतात.”
– डॉ. अनिल परदेशी, मैथिलीचे वडिल





