Uttar Pradesh : डिंपल यादव यांनी घेतली लोकसभेची शपथ

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर निवडून आलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्या डिंपल यादव यांनी सोमवारी लोकसभेच्या सदस्य म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर डिंपल यादव यांनी विरोधी बाकावर समोरच्या रांगेत बसलेल्या कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
शपथविधीसाठी त्यांचे नाव पुकारले जाताच अनेक सदस्यांनी त्यांचे बाके वाजवून स्वागत केले. या कार्यक्रमासाठी त्यांचे पती आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव अभ्यागतांच्या गॅलरीत उपस्थित होते.
डिंपल यादव यांनी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. ही जागा त्यांचे सासरे मुलायमसिंह यादव यांची होती. पण त्यांचे निधन झाल्यानंतर तिथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. या निवडणुकीत डिंपल यादव यांनी मोठे मताधिक्य मिळवले आहे.
#BharatJodoYatra : राहुल यांच्या यात्रेत प्रियंका गांधी’ पुन्हा सहभागी
डिंपल यादव यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार रघुराज सिंह यांना 2 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केले आहे. या निवडणुकीतील विजयासह त्या तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.





