मायणीचा “भोंगा फॅक्टर’ जिल्ह्यात गाजणार

प्रशांत जाधव
पोलीस दलाचा उपक्रम; चोऱ्या रोखण्यासाठी गावागावांत वाजणार सायरन
सातारा – मायणी (ता. खटाव) येथील पोलीस चौकीच्या हद्दीत येणाऱ्या प्रत्येक गावात आता अनोखी रात्रगस्त घातली जाणार आहे. मायणी येथे मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक अधिकाऱ्यांच्या बैठकीत चौकीच्या हद्दीतील 36 गावात प्रत्येकी एक असे भोंगे (सायरन) बसवण्याची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेण्याच्या सूचना अधीक्षकांनी दिल्या.
प्रत्येक गावातील एका जागृत घरात भोंगा बसवून रात्रभर तो वेळोवेळी वाजवला जाणार आहे. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. आजवर मायणीतील राजकीय संघर्षाचा फॅक्टर जिल्हाभर गाजला होता. ती ओळख पुसून आता जिल्ह्यात मायणीचा “भोंगा’ फॅक्टरचा उदय होणार आहे. सध्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे तसेच ग्रामस्थांच्या जागरूतकतेमुळे रात्रीच्या चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी असल्याचे पोलीस दप्तराच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.
असे असले तरी कमी असलेले हेच चोऱ्यांचे प्रमाण संपुष्टात येण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. चोऱ्यांच्या वाढत्या प्रकारामुळे त्रस्त नागरिक अनेकदा गावच्या पातळीवरच रात्रगस्त घालतात. मात्र, स्थानिक वाद तसेच इतर कारणांमुळे रात्रगस्तीचा उपक्रम मागे पडला आहे. त्यामुळे गावागावांतील लोकांना आता जागे ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने अनोखा मायणीचा भोंगा फॅक्टरची योजना आखली गेली आहे. आता या भोंगा फोक्टरमुळे रात्रभर गावातून गस्त घालण्यासाठी लोकांना जागण्याची आवश्यकता नाही.
कारण गावातील सुशिक्षीत, जास्त लोक असणारे घर, तसेच जागरूक नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम मायणी पोलीसांनी सुरू केले आहे. कारण यातील एका कुटुंबात एक सायरन (भोंगा) बसवला जाणार आहे. जो सायरन त्या घरातील व्यक्तींनी रात्रीच्या वेळी वाजवायचा आहे. जेणेकरून सायरनच्या आवाजाने गावातील इतर लोक जागरूकराहतील आणि
चोरीच्या घटना गावात होणार नाहीत. मायणी या गावाची पक्षी आश्रयस्थान, पेरूंच्या बागा व त्यानंतर राजकारणातील हेवदावे हीच या गावाची जिल्हाभर ओळख होती. पोलीस दप्तरी अतिसवेंदनशील म्हणून नोंद असलेले हे गाव कालातंराने शिक्षणाच्या सुविधांसाठी ओळखले जाऊ लागले होते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह राज्यातील व देशातील विद्यार्थी या गावात उच्च शिक्षणासाठी येत आहेत. या ओळखीनंतर आता मायणीच्या “भोंगा’ फॅक्टरचा अवलंब व्यवस्थित झाल्यास जिल्हाभर हा फॅक्टर राबवला जाईल आणि मायणीची वेगळी ओळख तयार होईल.
यंत्रणेला मदतीची गरज
पोलीस यंत्रणा भोंगा संकल्पना राबवत असली तरी त्यासाठी सरकारी निधीची तरतूद नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतल्यास हा अभिनव प्रयोग तातडीने पूर्णत्वास जाण्यास मदत होईल.
36 गावे 36 भोंगे
मायणी पोलीस चौकीच्या हद्दीत सुमारे 36 वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. या गावांतील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच नोकरदार मंडळीनी या संकल्पने हातभार लावल्यास 36 गावे 36 भोंगे हा नवा पायंडा पडून जिल्हाभर याची प्रेरणा घेत गावकरी सरकारची वाट न पाहता ही संकल्पना राबवतील.




