पुणे | बोपदेव घाट बलात्कारप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात मुख्य आरोपीला पुणे पोलिसांनी प्रयागराज येथून ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी दुपारपर्यंत शहरात आणले जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
अख्तर शेख (३२, रा. उंड्री, मूळ प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात एका भंगाराच्या दुकानात काम करत होता. गुन्हा केल्यानंतर तो दुसऱ्याच दिवशी नागपूर येथे पळाला. तेथे त्याची पत्नी राहात होती.
तर, प्रयागराज येथे त्याच्या दोन पत्नी आहेत. नागपूर येथून त्याने प्रयागराजला पळ काढला. पुणे पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. नागपूर येथे तो सापडला नाही. यामुळे पथक माघारी आले. दरम्यान, तो प्रयागराजला असल्याची माहिती पथकाला शनिवारी रात्री मिळाली.
त्यांनी रात्री बारा वाजता दिल्ली आणि तेथून पहाटे पाच वाजता विमान, गाडीने प्रयागराज आणि पुढे सव्वाशे किलोमीटरवरील शेख याचे गाव गाठले. तेथे अख्तरला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
अख्तरवर इंदापूरमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तसेच तरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.





