प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्यातील सर्वाधिक पुढाऱ्यांचे गाव असलेल्या तळेगाव ढमढेरे- रांजणगाव सांडस झेडपी गटाला गेल्या २३ वर्षांत दोनवेळा महिला प्रवर्गात महिलांना तर दोनवेळा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात नेत्यांना संधी मिळाली होती. आता पुन्हा तळेगाव गटावर महिलाराज असल्याने खुल्या प्रवर्गात इच्छुक उमेदवारांना हुलकावणी दिली आहे. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांच्या सौभाग्यवतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. २००२ मध्ये तळेगाव ढमढेरे- रांजणगाव सांडस गटातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व. किसनभाऊ भुजबळ हे विजयी झाले होते. २००७ साली तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर गटातून शिक्रापूरच्या रोहिणी सासवडे विजयी झाल्या होत्या. २०१२ साली तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर गटातून शिक्रापूरचे मंगलदास बांदल हे विजयी झाले. २०१७ साली तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस गटातून शिक्रापूरच्या रेखा बांदल यांनी अपक्ष विजय मिळविला होता. त्यामुळे भुजबळ यांच्यानंतर तळेगाव गटात हुलकावणी मिळाली आहे. २०२२ पासून लांबणीवर पडलेल्या झेडपी व पंचायत समिती निवडणुकांसाठी गट व गणांचे आरक्षण जाहीर झाले. त्यात तळेगाव गट आणि पंचायत समिती गण या दोन्ही ठिकाणी महिला (सामान्य) वर्गासाठी आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे पुन्हा गटावर “महिलाराज” आले. तीन वर्षांपासून गटात प्रस्थापित, मातब्बर नेत्यांनी तयारी सुरु ठेवली होती. मात्र, आरक्षण जाहीर होताच मातब्बर उमेदवारांनी केलेल्या तयारीवर पाणी फिरले आहे. काही संभाव्य उमेदवारांनी तयारी थांबवली आहे. कोणाची चलती? तळेगाव ढमढेरे झेडपी गटातून जोरदार तयारीत असलेले ॲड. अशोक पवार यांचे कट्टर समर्थक उद्योजक राहुल करपे यांनी चार वर्षापासून मतदारसंघात चांगलाच जम बसविला आहे. महिला आरक्षण आल्याने त्यांच्या पत्नी सारिका करपे या मैदानात उतरल्या आहेत.तर जिल्हा परिषद सदस्या राहिलेल्या जिजामाता सहकारी बँकेच्या अध्यक्षा रेखा बांदल यांनी १० वर्षापासून गटात वर्चस्व राखले आहे. मोठ्या प्रमाणात संघटन उभे केले आहे. इच्छुक उमेदवारांनी मतदारांसाठी देवदर्शन मोफत यात्रा सुरू केल्या आहेत. वेट ॲण्ड वॉचची भूमिका.. जिल्हा परिषद गटात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकासकामांचा धूमधडाका लावणारे भाजपाचे तालुकाध्यक्ष जयेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद गट) तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) महिलाध्यक्षा आरती भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) महिलाध्यक्षा विद्या भुजबळ, शिवसेना (उभाठा गट) तालुकाध्यक्षा चेतना ढमढेरे हे सर्व पदाधिकारी याच गटातील आहेत. यातील काही पदाधिकारी इच्छुक देखील आहे. परंतु सध्यातरी यांनी वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.पक्षाची धोरणे व आदेश यावर यांच्या भूमिका ठरतील, असा अंदाज आहे . आरक्षणाबाबत हरकत दाखल.. तळेगाव ढमढेरे गट व पंचायत समिती गणात पुन्हा महिला आरक्षण पडल्याने या गटातील इच्छुक पुरुष उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे हरकत दाखल केली असल्याचे समजते. यावेळी पुरुष आरक्षण पडेल या अपेक्षेने पुरुष उमेदवारांनी जोरदार तयारी केली होती. पण आरक्षण पुन्हा तेच पडल्याने या उमेदवारांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.