महेश नागरीचा 26 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कात्रज : महेश नागरी मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीचा 26 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गरजूंना आर्थिक मदतीचा हात देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी “महेश नागरी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीची ओळख आहे. संस्थेने पारदर्शक कारभाराने ग्राहकांचा विश्वास संपादन करून प्रगतीची गरुड भरारी घेतली आहे. यंदा दसरा व वर्धापन दिनानिमित्त वाहन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संस्थेची स्थापना स्व. धनराज राठी यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर १९९८ मध्ये केली होती. तेव्हापासून संस्थेने ग्राहकांचे हित जपले आहे. संस्थेचा विस्तार मोठा असून 5 शाखा महाराष्ट्रात तर एक शाखा राजस्थानमध्ये असून दोन नवीन शाखा सुरत आणि पिंपरी चिंचवडमध्ये कार्यान्वित होणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सुखसागरनगर येथील मुख्य कार्यालयात आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व संस्थेच्या सभासदांनी आणि ठेवीदारांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी व इतर संचालक सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेच्या एकूण 174 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर, कर्जवाटप 100 कोटी रुपयांचे असून सभासद संख्या ७ हजारावर पोहोचली आहे. तर या वर्षात संस्थेला 1 कोटी 56 लाख रुपयांचा नफा प्राप्त झाला आहे. सभासदांसाठी खास विशेष ठेव योजना, रिकरिंग ठेव योजना देण्यात आल्या आहेत. या योजनांवर ८.५० व्याजदर मिळणार असल्याने सभासदांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला असल्याचे व्यवस्थापकीय संचालक मगराज राठी यांनी सांगितले.





