“महायुतीचे ‘रिपोर्ट’ नव्हे तर ‘डिपोर्ट’ कार्ड” – आदित्य ठाकरे

मुंबई – महायुती सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले रिपोर्ट कार्ड पाहता त्यांच्या रिपोर्टकडचे नाव महाराष्ट्र आता डिपोर्ट कार्ड करणार असल्याचा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. कारण अनेक गोष्टी त्यांनी महाराष्ट्रातून डिपोर्ट केल्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या रिपोर्ट कार्ड वर हल्ला चढवला. महायुतीची पत्रकार परिषद होताच आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर हे आरोप केले आहेत.
अदानी समूहाच्या फायद्याचे सर्व जीआर प्रकाशित होत नाही, तोपर्यंत आचारसंहिता लागू होत नाही, असे मी आधी देखील सांगितले होते. आचारसंहिता लागण्याआधीच मुंबई आणि राज्यातील मोठे भूखंड अदानी समूहाला देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मधील मंत्रिमंडळाच्या बैठका पाहिल्या तर त्यांच्या प्रत्येक बैठकीत जनतेला काहीतरी देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र या सर्व बैठकांमध्ये अदानी समूहासाठी काही निर्णय घेण्यात आले होते, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
मुंबईतील टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तो अत्यंत कमी टोल असल्यामुळे लोकांना काहीतरी आपल्या हातात मिळत असल्याचे वाटते. मात्र यासोबतच अनेक भयानक गोष्टी महायुती सरकारने केल्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मतदानाच्या दिवशी महाराष्ट्राने या सर्वांवर विचार करणे आवश्यक असल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे.
सरकारच्या अनेक भयावह गोष्टी समोर
धारावी पुनर्विकास योजनेबद्दल आमचे सर्व मित्र पक्ष सतत आरोप करत आहोत. त्यासाठी अनेक मोर्चे, सभा, चौक सभा, बैठका आम्ही घेतल्या आहेत. मीडियाच्या माध्यमातून देखील या योजनेबद्दलच्या अनेक भयानक गोष्टी समोर येत आहेत. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत पन्नास रुपयांची सूट सर्वसामान्य जनतेला दिली जाते तर 50 कोटी रुपयांचा फायदा अदानी समूहाला दिला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.





