Maharashtra Politics : महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाला वेग आलेला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमित शाह यांनी भाजपने जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, अशी आग्रही सूचना मुंबईत झालेल्या बैठकीत रविवारी केली. त्यामुळे आता तिन्ही पक्षातील संभाव्य जागावाटपाचा पहिला फॉर्म्युला आता समोर आला आहे.
काय आहे फॉर्मुला ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विधानसभेची सूत्रे हाती घेतलेली असून भारतीय जनता पक्षाने १७० जागा लढवाव्यात, अशी तयारी केली आहे. यातील १५५ ते १६० जागांवर प्रत्यक्ष उमेदवारीसाठी भाजपचा दावा असणार आहे. महायुतीसोबत असणाऱ्या मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातूनच उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच सरकारमध्ये प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ६५ ते ७५ जागा मिळण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ५५ ते ६० जागा देण्याची भाजपची तयारी आहे.
महायुतीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता
अजित पवार यांची महायुतीत एन्ट्री झाल्याने बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर युतीत बंडखोरी वाढण्याची अधिकची चिन्हे आहेत. यावर तोडगा म्हणून बंडखोरी रोखण्यासाठी १५ ते १८ जागांवर मैत्रीपूर्ण लढती होण्याचीही दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.





