‘मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला आहे…’, महायुती सरकारमधील मंत्र्यांची बोचरी टीका

Ashish Jaiswal on Manoj Jarange Patil : ‘मनोज जरांगे यांच्या डोक्यात फरक पडला आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.’, अशा शब्दात महायुती सरकारमधील राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी जरांगे पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला आता आशिष जयस्वाल जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सध्या, राज्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर बोलताना जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेवर टीका केली होती. आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू, असा इशाराच त्यांनी दिला होता.
सरपंच संतोष देशमुख यांच्या बंधूंना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांच्या कुटुंबीयांना धक्का लागला तर मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. आता यावरून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे यांच्या डोक्यात फरक पडला आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका, अशी बोचरी टीका जयस्वाल यांनी केली.
बीड प्रकरणांमध्ये जो कोणी आरोपी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कायदा आपले काम करणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे, असे जयस्वाल यावेळी म्हणाले.




