वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात होणार वाढ

मुंबई : ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
काय झाले बैठकीत?
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या तिन्ही वीज कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के व सर्व भत्त्या मध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा 500 रुपयांचा भत्ता 1000 रुपया इतका करण्यात आला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.





