विधानसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी वर्तवलं भाकीत; म्हणाले ‘अबकी बार 225 पार…’

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका अवघ्या ३ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सगळ्या पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीसंदर्भात आज मोठे भाकीत केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 225 जागा जिंकेल असे विधान शरद पवार यांनी केले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं चित्र बदलताना दिसत आहे. शेतकरी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्रात एक शक्ती उभी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून अनेक लोक पक्षात सहभागी होत आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 225 जागा जिंकेल असे शरद पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हाती
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. सध्या महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. महाराष्ट्रात 48 खासदार आहेत. 5 वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांचे 6 खासदार निवडणूक आले होते. त्यामध्ये 4 राष्ट्रवादीचे होते. मात्र, गेल्या पाच वर्षातील सत्ताधाऱ्यांच्या कामाचा जो अनुभव आला तो लोकांना चांगला वाटला नाही असेदेखील शरद पवार म्हणाले आहेत.





