‘मविआ’ला नवे विघ्न! ‘५ जागा द्या अन्यथा २५ लढवू’ शरद पवारांकडे मित्रपक्षाचे अल्टिमेटम…

Mahavikas Aghadi Update महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ नोव्हेंबरला, तर निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. तिन्ही पक्षांनी आपापल्या पहिल्या यादीत काही जागांवर उमेदवारांची घोषणा केली असली, तरी अद्याप बऱ्याच जागांवर चर्चा सुरूच आहे.
यात भर म्हणजे, मित्रपक्षांना किती जागा मिळणार याबाबतही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे समाजवादी पक्षासह छोट्या घटक पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे. महायुतीचा एक प्रमुख घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने तर आता मविआला थेट अल्टिमेटमच दिला आहे.
पाच जागा मिळाल्या नाहीत, तर २५ जागांवर लढण्याची तयारी | Mahavikas Aghadi Update
महाविकास आघाडीकडून किमान पाच जागांची मागणी करणाऱ्या समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आपल्या मागणीवर ठाम राहण्याची भूमिका मांडली आहे. शरद पवार यांच्याशी नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “शरद पवार यांच्यासारखा मोठा नेता महाविकास आघाडीत दुसरा कोणी नाही, त्यामुळे आम्ही केवळ त्यांच्याकडेच आपली मागणी मांडली आहे. पाच जागांची यादी मी त्यांच्यासमोर ठेवली आहे. जर या जागांवर आमचा निर्णय झाला नाही, तर माझ्याकडे २५ उमेदवार तयार आहेत, आणि आम्ही स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे.”
आझमी यांनी काँग्रेसवरही टीका केली, “माझी काँग्रेसकडून यापूर्वी दोन वेळा फसवणूक झाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहा असे सांगितले जाते आणि शेवटी उमेदवारी नाकारली जाते. आता मात्र आम्ही तीच चूक पुन्हा करू इच्छित नाही.”
आघाडीतील तणाव अधिक तीव्र? | Mahavikas Aghadi Update
शरद पवार यांनी आझमी यांना एक दिवस थांबण्याचा सल्ला दिला आहे. आझमी यांनी त्याला मान्यता दिली असून, ते म्हणाले, “जर ५ जागांची घोषणा झाली, तर मी आघाडीत राहण्यास तयार आहे. पण जर तसे झाले नाही, तर आमचे २५-३० उमेदवार निवडणूक लढवतील, आणि आघाडीतून बाहेर पडण्यासही आम्ही तयार आहोत.”
महाविकास आघाडीसाठी ही स्थिती मोठे आव्हान ठरणार असून समाजवादी पक्षासारखे मित्रपक्ष आघाडीतून बाहेर पडल्यास मतविभाजनाचा धोका आहे. महाविकास आघाडीने यापूर्वी लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले असले, तरी विधानसभा निवडणुकीत अशा अडचणींमुळे आघाडीत तणाव निर्माण होत आहे. | Mahavikas Aghadi Update





