महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा

मुंबई – बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. या आंदोलनामध्ये मविआतील सर्व मित्र पक्ष, घटक पक्ष, अनेक संघटना, शाळा, महाविद्यालये, दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली.
मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी, येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही देत आहोत. यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व पक्ष सहभागी होणार आहेत, अशी माहिती दिली.
नाना पटोले म्हणाले, बदलापूरमधील घटना ही समाजाला हेलावून टाकणारी घटना आहे.
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसशी संबंधीत आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.… pic.twitter.com/rkAlPq4otA
— Nana Patole (@NANA_PATOLE) August 21, 2024
महाराष्ट्रातील लहान मुलीदेखील आता सुरक्षित नाहीत. ही घटना राज्याला काळिमा फासणारी आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न राज्याचे सरकारने केला. संबंधित शाळेची संस्था ही भाजप आणि संघाशी निगडित असल्याने भाजप आणि संघाची बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर समाज माध्यमात हे प्रकरण आल्यानंतर उद्रेक झाला, असे आरोपही नाना पटोले यांनी केले.
एका महिला पत्रकाराला ज्या पद्धतीचे वाक्य वापरले, महायुतीच्या पदाधिकार्याने केलेले विधान हे निषेध करण्यासारखेच आहे. महायुतीला या घटनेशी काहीही संबध नसल्याचे यातून दिसून येते. तसेच, सत्ता आणि सत्तेची गरमी हीच भूमिका सरकारची पाहायला मिळत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
तसेच आम्हाला या घटनेचे राजकारण करायचे नाही. पण महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचे काम रोज राज्यात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला, शाहू फुलेंच्या विचारांच्या महाराष्ट्राला अपमानित आणि काळिमा फासण्याचे काम होत असून आम्ही निषेध करतो.




