पुणे | गॅस गळतीमुळे महावितरणच्या फीडर पिलरला आग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) पाइपलाइनमधून गॅस गळतीमुळे जवळच असलेल्या महावितरणच्या उच्चदाबाच्या फीडर पिलरला बुधवारी आग लागली. त्यामुळे सुमारे ३ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुमारे पाऊण तास बंद होता. रामवाडी येथील बिशप शाळेजवळ हा प्रकार घडला.
रामवाडी येथे बिशप शाळेजवळ महावितरणचा उच्चदाबाचा फीडर पिलर आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास अतिरिक्त पर्यायी व्यवस्था म्हणून हा फीडर पिलर लावण्यात आला आहे. त्या जवळच एमएनजीएलची पाइपलाइन आहे. मात्र, आज सकाळच्या सुमारास पाइपलाइनमधून गॅस गळती होऊन आग लागली.
ही आग फिडर पिलरपर्यंत पोहाचल्याने त्यानेही पेट घेतला. त्यामुळे उपकेंद्रातील वीजवाहिनी ट्रीप होऊन वीजपुरवठा खंडित झाला, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. या प्रकाराची माहिती कळताच महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन वीज पुरवठा बंद झाल्याची खात्री केली व फीडर पिलरच्या भूमिगत वाहिन्या वेगळ्या केल्या. त्यानंतर बंद पडलेली उपकेंद्रातील वीजवाहिनी पुन्हा सुरू करण्यात आली.
आमचा संबंध नाही : एमएनजीएल
दरम्यान, “आगीच्या घटनेशी एमएनजीएलचा कोणताही संबंध नाही. आमच्या गॅस वाहिनीचे नुकसान होण्यापूर्वीच 30 मिनिटे आधीच महावितरणच्या फीडर पिलरला आग लागली होती. त्यामुळे महावितरणने याची सखोल माहिती घ्यावी. या आगीशी एमएनजीएलचा काहीही संबंध नाही,’ असा दावा एमएनजीएल कंपनीने केला आहे.




