Bharat Gogawale on Aditi Tatkare : रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढत चालला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्यातील रस्सीखेच कायम आहे, तर नाशिकमध्ये शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यातील वाद तितकाच तीव्र आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने ११ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार, याची यादी जाहीर केली. या यादीत रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. अदिती तटकरेंना मान, गोगावले समर्थक संतप्त रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा होताच, शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर उमटला. भरत गोगावले यांना यंदा ध्वजारोहणाचा मान मिळेल, अशी अपेक्षा शिंदे गटातील शिवसैनिकांना होती. मात्र, सरकारने पुन्हा एकदा अदिती तटकरे यांना प्राधान्य दिल्याने गोगावले आणि त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. यापूर्वीही प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनी तटकरे यांनीच रायगडमध्ये ध्वजारोहण केलं होतं, ज्यामुळे गोगावले समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कॅबिनेट बैठकीवर गोगावलेंची बहिष्काराची भूमिका? १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला भरत गोगावले अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने गोगावले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मुंबईबाहेर असल्याचं सांगत कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केलं. गोगावले यांनी यामागे कौटुंबिक कारणे असल्याचं म्हटलं असलं, तरी राजकीय वर्तुळात यामागे ध्वजारोहणाच्या मानपानावरून नाराजी असल्याची जोरदार चर्चा आहे. यापूर्वीही गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी तीव्र इच्छा व्यक्त केली होती, आणि तटकरे यांना प्राधान्य मिळाल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद गेल्या दहा महिन्यांपासून कायम आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमके कोण असतील, यावर एकमत झाले नाही. जानेवारी २०२५ मध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद जाहीर झालं होतं, पण शिंदे गटाच्या विरोधामुळे आणि गोगावले समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने हा निर्णय दोनच दिवसांत रद्द झाला.