Khelo India : महाराष्ट्राच्या सुकांत, प्रेमची खेलो इंडिया पॅरा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सुकांत कदम, प्रेम अले यांनी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी देत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जिम्नॉस्टिक्स हॉलमध्ये सुरू असलेल्या पॅरा बॅडमिंटनमध्ये एसएल 4 गटात सांगलीचा सुकांत कदमने महाराष्ट्राच्याच निलेश गायकवाडचा 21-10, 21-19 सेटने पराभव केला.
जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असणार्या सुकांतने पहिला सेट सहजपणे जिंकून लढतीवर पकड घेतला होती. मात्र दुसर्या सेटमध्ये त्याना संघर्ष करावा लागला. अनुभवी सुकांतने आघाडी कायम राखत विजयी सलामी दिली. पॅरीस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणार्या सुकांत प्रथमच खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत सहभागी झाला आहे.
विलचेअरच्या डब्ल्यू एच 1 गटात महाराष्ट्राच्या प्रेमकुमार अलेने उत्तरप्रदेशच्या सिराजउद्दीनवर 21-12, 21-14 अशी सहज मात केली. प्रेमकुमारने पहिली फेरी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. सेनादलातून निवृत्त झाल्यानंतर पॅरा बॅडमिंटन खेळण्याचा श्रीगणेशा पुण्यातून केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 सुवर्णपदकांचा कामगिरी करणारे प्रेमकुमार प्रथमच खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तत्पुर्वी दुसर्या स्पर्धेचे शानदार उद्घाटन केेंद्रिय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांच्या हस्ते करण्यात आले.





