Federation Cup 2021 | महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम

पतियाळा -महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याने फेडरेशन करंडक स्पर्धेत तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात राष्ट्रीय विक्रम साकार केला. अविनाशने 8 मिनिट 20.20 सेकंदाची नवी वेळ दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रीडा संस्थेत सुरू असलेल्या या स्पर्धेत भालाफेक प्रकारात नीरज चोप्रा याने स्वतःचा स्पर्धा विक्रम मोडला, तर गोळाफेर प्रकारात तजिंदरपाल सिंग याने ऑलिम्पिक पात्रतेसाठी जोरदार प्रयत्न केले.
नीरजने या स्पर्धेत 87.80 मीटर भालाफेक करताना नवा स्पर्धा विक्रम केला. अर्थात, 88.07 मीटरचा राष्ट्रीय विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्यापूर्वी, तजिंदरपाल सिंग याने पाचव्या प्रयत्नांत 20.58 मीटर गोळा फेक केली. मात्र, तो देखील ऑलिम्पिक पात्रतेपासून दूरच राहिला. त्याला अजूनही ऑलिम्पिक पात्रतेची संधी आहे.
महिलांच्या 3,000 स्टिपलचेस शर्यतीत उत्तर प्रदेशाच्या पारुल चौधरी हिने अखेरच्या 200 मीटरमध्ये महाराष्ट्राच्या कोमल जगदाळेला पराभूत केले. पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत हिमाचल प्रदेशाच्या अंकेश चौधरी याने उपांत्य फेरीत 1 मिनिट 50.81 सेकंद अशी वेगवान वेळ दिली. उपांत्य फेरीत ही तिसऱ्या क्रमांकाची विक्रमी वेळ ठरली. पण, अंतिम फेरीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या मनजित सिंगचे आव्हान असेल.





