Ultimate Kho Kho 2022 : गुजरातच्या यशात महाराष्ट्राच्या ‘अभिनंदन’ची चमक

पुणे – पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत गुजरात जायंट्सने सुरेख कामगिरी करत चार सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्राच्या अभिनंदन पाटीलने यंदाच्या मौसमात गुजरात जायंट्स संघासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे.
21 वर्षीय कोल्हापूरचा अभिनंदन पाटील हा या स्पर्धेत 35 गुणांसह वझीरच्या अव्वल तीन खेळाडूंमध्ये आहे. तर, ओडिशा जुगरनट्सचा सुभाषिश संत्रा(38) आणि मुंबई खिलाडीजचा दुर्वेश साळुंखे(30)हे अल्टीमेट खो खो सीझन 1 मधील इतर दोन सर्वोत्तम कामगिरी करणारे वझीर आहेत.
गुजरात जायंट्स संघाला ओडिशा जुगरनॉट्सविरुद्धच्या लढतीत या मौसमातील आपल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले, परंतु तरीही गुजरात संघाला तीन गुणांऐवजी एक गुण मिळवून गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखण्यात यशस्वी झाले.
2019 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघातील सदस्य असलेल्या पाटीलने सहा वेळा नाबाद राहून बचावातही उल्लेखनीय कामगिरी करता आली.





