भाजप नेत्याच्या पत्नीवर हिप्नोटिज्मचा प्रयोग? तब्बल २० लाखांची फसवणूक; नेमकं काय आहे प्रकरण ‘वाचा’

कोल्हापूरचे भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांच्यासोबत फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नवोदिता घाटगे यांची तब्बल २० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली.
मिळलेल्या माहितीनुसार, भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांची काही दिवसापूर्वीच अज्ञातांनी 20 लाख रुपयांची फसवणूक केली. मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्स आणि बनावट पासपोर्ट असल्याची बतावणी करून आयकर आणि सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत दोघाजणांनी ऑनलाईन ही फसवणूक केली. दरम्यान या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ गटाने घाटगे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.यावर आता नवोदिता यांनी आपली भूमिका मांडली आहे.
यावर नवोदिता म्हणाल्या,’या फसवणूक प्रकरणावरून राजकारण करण्याची गरज नाही. समरजित घाटगे यांचं नाव यात घ्यायचं कारण नाही, मी रीतसर याबाबत पोलिसात तक्रार केली आहे.’ असं म्हणत विरोधकांना त्यांनी ठणकावलं आहे. पुन्हा कोणाची अशी फसवणूक होऊ नये म्हणून मी रीतसर तक्रार सुद्धा दिली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पार्सलचं कारण सांगून मला एका प्रकारे हिप्नोटाईज करण्यात आलं. यामध्ये मला 20 लाख रुपये गमवावे लागले. हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे.मात्र पुन्हा कोणाची अशी फसवणूक होऊ नये म्हणून मी पोलिसांमध्ये रीतसर तक्रारसुद्धा दिली आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून राजकारण करण्याची गरज नाही आणि समरजित घाटगे यांचं नाव यात घ्यायचं कारण नाही, असं त्यांनी ठणकावलं. दरम्यान समरजित घाटगे यांनी देखील पत्नीची पाठराखण केली आहे.





