Maharashtra Weather Update : थंडी पळाली, उकाडा वाढला; राज्यात तापमानाचा पारा तिशीपार, ‘या’ शहरात रेकॉर्डब्रेक नोंद
Maharashtra Weather Update : कोकणात पारा ३५ अंशांच्या पार गेला असून भिरा येथे सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

Maharashtra Weather Update : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. शिवाय कमाल तापमानाचा पारा सध्या तिशीपार गेला आहे. कोकणात उन्हाचा चटका वाढल्याने भिरा येथे सगळ्यात जास्त ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेले काही दिवस राज्यात थंडी, पाऊस, ऊन यांचा संमिश्र खेळ पाहायला मिळाला. दरम्यान शिमगोत्सवापूर्वीच उकाडा भलताच वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे गारवा नाहीसा होऊन उन्हाची काहिली भलतीच तापदायक ठरत आहे. हा उकाडा पुढील काही दिवस असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात कमाल तापमान पस्तिशीपार गेले आहे. राज्यात दिवसभर अंशत: ढगाळ हवामान असल्याने उकाडा कायम आहे. आज अंशत: ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात उकाडा जाणवत असला तरीही काही राज्यात ढगाळ वातावरण आणि वादळी वा-यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.





