Maharashtra Weather Update : राज्यावर सध्या पावसाचे सावट; ‘या’ भागात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात आणि विशेषकरुन विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने गारपीट सुरू आहे. येत्या २४ तासात विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हयांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यांच्या परिणामामुळे राज्यावर सध्या पावसाचे सावट आहे.
मागील आठवड्यापासूनच राज्यात अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. राज्यातील कोणत्या ना कोणत्या भागात पाऊसच नाही तर वादळीवारा आणि गारपिटीचा फटका देखील बसला आहे. विदर्भातही वेगवेगळ्या ठिकाणी वादळीवारा आणि गारपीटीचा फटका बसला आहे. गेले दोन दिवस नागपूर शहरात देखील वेगवेगळ्या भागात वादळीवाऱ्यासह गारपीट झाली.
तर आता पुन्हा भारतीय हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रास आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील काही दिवसांसाठी राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दोन आठवड्यापूर्वी राज्यात कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर गेला होता. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. तब्बल आठवडाभर विदर्भात तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवण्यात आले. मात्र, त्याचवेळी ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह थेट गारपीट झाली आणि तापमानात झपाट्याने घट झाली.
दरम्यान, आता पुन्हा वादळीवारा, ढगांच्या गडगडाटासह राज्यात विविध ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव येथे येत्या पाच ते सात मे दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सहा ते सात मे दरम्यान अहिल्यानंतर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच मुंबई येथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज सोमवारी विदर्भात पुन्हा एकदा गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





