सूर्य कोपला..! राज्यात उष्णतेची लाट; अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे
Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. नाशिकमध्ये मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली

Maharashtra Weather : राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असून अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट नोंदवण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास होत असून प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या जिल्ह्यांत उष्णतेची लाट
आज विदर्भातील अमरावती, अकोला, ब्रम्हपुरी आणि यवतमाळ येथे उष्णतेची लाट नोंदवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे.
नागपूर – 39
अकोला – 42
अमरावती – 42.2
ब्रह्मपुरी – 40.8
चंद्रपूर – 40.2
वर्धा – 40.2
वाशिम – 40.2
यवतमाळ – 40
बुलढाणा – 39.5
गडचिरोली – 39.4
जळगाव – 40.1
पुणे – 38.1
परभणी – 39.8
सांताक्रुज – 33.1
बीड – 38.5
नाशिक – 38.5
कोल्हापूर – 37.1
सातारा – 37.5
सोलापूर – 39.1
संभाजीनगर – 39.8
मालेगाव – 39.6
सांगली – 38
नवी मुंबई – 39
नंदुरबार – 41
दरम्यान नाशिक येथे यंदाच्या मोसमातील उच्च तापमानाची नोंद झाली असून कमाल तापमान 38.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. किमान तापमान 16.8 अंश असल्याने कमाल-किमान तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे.
कोकणात उष्ण आणि दमट हवामान
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अनुभव येत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांतही या भागात उष्ण व दमट वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
वाढत्या उष्णतेमुळे शाळांच्या वेळेत बदल
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शाळा सकाळी 7 ते 11.30 या वेळेत भरवण्यात येणार आहेत.
हवामान तज्ज्ञांच्या मते, मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ झाल्याने पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

