Maharashtra rain : महाराष्ट्रावर पावसाचे ढग; 30 जिल्ह्यांना अलर्ट, ‘या’ भागात दमदार पावसाचा इशारा
Maharashtra rain : महाराष्ट्रात 13 सप्टेंबरला पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. 27 जिल्ह्यांना यलो तर 3 ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra rain : रविवार (दि. १३) रोजी राज्यातील ३० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने २७ जिल्ह्यांना यलो, तर तीन ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे कोणताही इशारा नसला तरी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि कोकणातही पावसाची शक्यता कायम आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी पावसाच्या सरी आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि नाशिकला यलो, तर धुळे, नंदुरबार आणि नाशिक घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट परिसरातून प्रवास करताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे घाटमाथा, सातारा आणि सातारा घाटमाथ्याला यलो अलर्ट आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह अन्य भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची स्थिती पाहून शेतीच्या कामांचे नियोजन करावे.
विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अलर्ट असलेल्या सर्वच भागांत मुसळधार पाऊस पडेल असे नाही. स्थानिक परिस्थितीनुसार पावसाचा जोर कमी-अधिक होऊ शकतो. मात्र, ऑरेंज असलेल्या भागांत नागरिकांनी अधिक सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरातील शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक भागात उभी पीकं पावसाअभावी करपत आहेत.





