महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; वादळासह विजांच्या कडकडाटाचा इशारा

Maharashtra Weather । मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी दिसत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे तर काही ठिकणी पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आता राज्यातील वातावरण पुन्हा एकदा बदलणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने 6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच वादळासह विजांच्या कडकडाटाचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईतील बहुतांश भागात ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याचे संकेत आहेत. या कालावधीत तापमान 26 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग ताशी 15 किलोमीटर इतका राहणार आहे.
या जिल्ह्याला यलो अलर्ट Maharashtra Weather ।
हवामान खात्याने अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि वाशीमसह महाराष्ट्रातील अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे. आता पुण्यासह राज्याच्या काही भागात पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनची कामगिरीही अपवादात्मक ठरली आहे.
या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला Maharashtra Weather ।
हिंगोली वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊसही पडला आहे. त्यात पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा समावेश आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार सांगलीत ६३ टक्के तर पुणे जिल्ह्यात ६२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. या पावसाळ्यातील पर्जन्यमानाच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील 36 पैकी 25 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे समोर आले आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारताच्या भागात कमी पाऊस पडण्याचे संकेत आहेत. 16 ऑगस्टनंतर, 23-24 ऑगस्टच्या आसपास मध्य भारतातील भागात पुन्हा एकदा मान्सूनच्या हालचाली तीव्र होण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे देशाची राजधानी दिल्लीत सलग सहाव्या दिवशी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीतील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दिवसभर ढगांची हालचाल सुरू राहणार आहे. या वेळी ताशी १६ किलोमीटर वेगाने वारेही वाहू शकतात.





