राज्यात पुढील तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा ; विदर्भ, उत्तर महाराष्ट्र गारठला, जळगावात 8.4 अंशाची नोंद

Maharashtra Weather । मागच्या काही दिवसात उत्तरेकडील शीत लहरींचा प्रभाव चांगलाच वाढला आहे. या शीत लहरींचा परिणाम आता राज्यावर चांगलाच जाणवत आहे. उत्तरेतील थंडीमुळे राज्यात चांगलाच गारठा वाढलाय. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान शुन्याखाली गेले आहे. दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दुसरीकडे बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात तापमानात काहीशी चढउतार होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, विदर्भात थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून उत्तर महाराष्ट्रही पूर्णपणे गारठला आहे. जळगावात काल 8.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर बहुतांश ठिकाणी तापमान 10 अंशांखाली गेल्याचे दिसून आले.
भारतीय हवामान केंद्राचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी तापमानाचा पारा घसरल्याचे सांगत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात बुधवारी किमान तापमानाच्या नोंदी सांगितल्या आहेत. राज्यात काल 8.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नांदेडमध्ये 8.9 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली. त्यानंतर नाशिक, बारामती, उदगीर, नागपूर जिल्ह्यात 9 अंशांवर तापमान गेले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली असून धाराशिव 8.6, नांदेड 8.9 अंश सेल्सियसवर होते. कुठे कसं होतं तापमान पाहूया..
पुणे शहराचा पारा 6.5 अंशांवर Maharashtra Weather ।
पुणे शहरासह जिल्ह्यात सोमवार पाठोपाठ मंगळवारी देखील थंडीचा कडाका जाणवला. एनडीए भागाचे तापमान मंगळवारी 6.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. शहराच्या किमान तापमानात काही भागात मंगळवारी देखील घट दिसून आली. एनडीए येथे सोमवारी 6.1 तर मंगळवारी 6.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. शिवाजीनगरचे तापमान सोमवारी 7.8 अंश सेल्सिअस होते ते मंगळवारी 8 अंशांवर गेले. तर उर्वरित भागाचे तापमान किंचित वाढले होते.
महाबळेश्वरमध्ये वेण्णालेकवर दवबिंदू गोठले Maharashtra Weather ।
महाबळेश्वर शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून थंडीचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. सोमवारी रात्री थंडीत वाढ होऊन मंगळवारी सकाळी वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा 4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेल्यामुळे दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते. महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे वेगवेगळे क्षण अनुभवता येत आहेत. वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. या परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोट्या पोटवल्याचं दिसून आले.





