राज्यात येत्या काही दिवसात थंडीचा जोर ओसरणार ; ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता ?

Maharashtra Weather । राज्यात सध्या थंडीचा जोर काहीसा कमी झाल्याचा दिसून येत आहे. त्यातच येत्या काही दिवसात राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार असून पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. त्यामुळे इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी Maharashtra Weather ।
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात 24 व 25 डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आर्दता वाढणार असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीला थोडा विराम लागणार असून तापमानात काहीशी वाढ होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसात थंडीनं सर्वजण हैराण झाले होते. 4 ते 5 अंशांवर असणारं किमान वाढलं असून राज्यात शनिवारी मध्य व उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 15- 18 अंशांपर्यंत गेलं होतं. पुण्यात थंडीचा कडाका कमी झाला असून शनिवारी 13-18 अंश तापमान होतं. मराठवाड्यात बहुतांश भागात गारठा कायम असला तरी किमान तापमान वाढले आहे.
पुढील 5 दिवस कसं राहणार तापमान? Maharashtra Weather ।
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार,उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजे, जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम आहे. कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यात गारठा जाणवत असून पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे.तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात येत्या 4-5 दिवसात किमान तापमान चढेच असेल. येत्या 24 तासांत किमान तापमानात हळूहळू 2-4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील पाच दिवस बहुतांश राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा काहीसा वाढलाय. मुंबईत कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये किमान तापमान 20 अंशांवर गेलं होतं.गारठलेल्या नाशकात 12 ते 18 अंशांची नोंद करण्यात आली. नगरमध्ये 13 अंश सांगली सातारा सोलापूरमध्ये 16 ते 18 अंश तापमान नोंदवलं गेलं. उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार, चंद्रपूर, गोंदिया, धुळ्यात किमान तापमानाचा पारा 15 ते 19 अंश होता.





